I jumped from an Aircraft @ 3500 ft ! – Skydiving India

12 Jan

स्काय डायव्हिंगचा रोमांचक थरार

the victorious feeling after safe landing

 

मी ज्यांना ज्यांना माझ्या ‘त्या’ शूटबद्दल सांगत होते त्या सगळ्यांनी मला एकच प्रश्न विचारला.
‘अय्या, ते ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’सारखं करणार तू?’- मी आपली हो हो म्हणत होते सगळ्यांना.
हे असं सगळं मनात सुरू असताना मी बारामतीला निघाले. तिथे भरला होता महाराष्ट्रातला पहिला स्काय डायव्हिंग फेस्टिव्हल. आम्ही जरा उन्हं चढल्यावरच पोहचलो. बारामती एअरपोर्ट, तशी एकदम चकाचक जागा. ७,७00 फुटांची धावपट्टी. आजूबाजूच्या परिसरात काहीच डोंगरदर्‍या नाहीत, नदी नाही की धरण नाही. टेक ऑफ आणि पॅराशूट लॅण्डिंगसाठी मोकळीढाकळी जागा.
with Shital Mahajan the dare-devil sky diverया फेस्टिव्हलचं संपूर्ण आयोजन शीतल महाजनने केलं होतं. मी शीतलला आधी कधीच भेटले नव्हते. पण तिच्याबद्दल खूप ऐकलं मात्र होतं. शीतल म्हणजे रेकॉर्ड्स! तीच ती दक्षिण-उत्तर ध्रुवांवर उड्या मारणारी. मागे एकदा फोनवरही बोललो आम्ही तेव्हा तिला नुकतीच जुळी मुलं झाली होती.
बारामतीत भेटली ती स्काय डायव्हिंगसाठी घालतात तो जंप सूट अंगावर चढवलेली शीतल. तिचा जंप सूट तिरंग्याचा होता. म्हणाली, ‘ऑल माय रेकॉर्डस् आर फॉर इंडिया, देशासाठी कायपण!’
कुणाला वाटेल विमानातून उडीच मारायची ना, त्यात काय एवढं? पण ते सोपं नसतं; दक्षिण-उत्तर ध्रुवावर तिनं उडी मारली, त्या भागात तर उणे ३३ डिग्री तपमान. त्यात बारा हजार फूट उंचावरून उडी मारायची म्हणजे ऑक्सिजन मिळणं मुश्किल.पण तरी तिनं ते केलं.
.कट टू बारामती. इथंही शीतलनं दहा हजार फुटांवरून उडी मारली. हवेत काही काळ तरंगली. पॅराशूटच्या सहाय्याने खाली आली. तिला बघून मीही एक्साईट झाले. तिनं विचारलं, ‘करशील का जंप?’
मी मनात म्हटलं, ‘आयडिया तो अच्छा है. लेकीन. सेफ्टी फस्ट.’
शीतलने मला इन्स्ट्रक्टरपाशी नेलं. त्यांनी माझा एक बेसिक इंटरव्ह्यू घेतला. माझा धाडसी भूतकाळ इथं कामी आला. मी याआधी पॅराग्लायडिंग केलं होतं. त्यामुळे मला पॅराशूट हॅण्डलिंगचा अनुभव होता. इथं कळलं की, स्काय डायव्हिंगच्या दोन लेव्हल्स असतात. त्यातली एक म्हणजे पॅरा जंप. पॅराशूट घेऊन विमानातून उडी मारायची, ती मारली की विमानाला अँटॅच असलेल्या एका दोरीच्या सहाय्यानं पॅराशूट आपोआप उघडतो.
दुसरा प्रकार म्हणजे टॅण्डेम जंप. इथे तुम्हाला काहीच करावं लागतं नाही. जंप मास्टर तुम्हाला पोटाशी बांधून उडी मारतो आणि हवेत फिरवतो. तो स्वत:च पॅराशूट हॅण्डल करतो. खाली आणतो. तुम्हाला फक्त नजारा एन्जॉय करायचा असतो. वरून तो तुम्हाला तुमचा फोटोही काढून देतो. तुम्ही फक्त त्याच्यावर विश्‍वास टाकायचा, बास!
पण मी म्हटलं यात काय शौर्य? मग मी शीतलला खणखणीत आवाजात सांगितलं, मी सोलो जंप करीन.
३५00 फुटांवरून मला एकटीला विमानातून उडी मारायची होती.माझा आवाज जरी कापरा नसला तरी माझं मन कापत होतं आणि ते सगळं माझ्या चेहर्‍यावरही दिसतच असणार. पण मी मनाची तयारी करत शांत एकटी बसले.
त्यातच कळलं होतं की, तुम्हाला जर अशी जंप मारायची असेल तर तुमचं वजन ४0 ते ९0 किलोच्या दरम्यानच असावं, तुम्हाला कोणती मोठी व्याधी नको. काही आजार नको.
तेवढं होतं माझ्याकडे. ना मला हार्ट प्रॉब्लेम, ना बीपीचा त्रास, मी स्वत:ला म्हटलं, ‘प्रियांका हीच वेळ आहे, करून टाक. जिंदगी ना मिलेगी दोबारा.!’
मी जंप सूट चढवला. हेल्मेट आणि ऑल्टिमीटर घातलं. हे सगळ्य़ात महत्त्वाचं डिव्हाईस. म्हणजे अल्टिट्यूड मोजणारं घड्याळ. त्यामुळे तुम्ही किती उंची गाठलीये हे तुम्हाला कळतं. आकाशातला तुमचा प्रवास मोजायला तुम्ही सुरुवात करता.
हे सारं कळलं, समजून घेतलं. पण तरीही माझ्या पायांचं थरकं होत होतं, पोटात भीतीनं गोळा आला होता.
आपण चालत्या विमानातून उडी मारायची.??that moment when u are in the air with no strings attached तो क्षण थोड्या वेळात आलाच!
एका छोट्या विमानातून मी आकाशात पोचले. पायलट सोडून फक्त तीन माणसं बसतील एवढं विमान. सेसना नावाचं. त्यात एक होता आमचा जंप मास्टर. आजवर मी विमानातून अनेकदा प्रवास केलाय; पण कधीच कुठल्या विमानाचा दरवाजा उघडा नसतो. या विमानाचा मात्र होता. जमिनीपासून उंच जाताना सहज दिसत होतं. वाईड अँगल व्ह्यू. त्यात वारा चिरणारा विमानाचा आवाज.आम्ही एकमेकांशी जे बोलत होतो ते ऐकूही येत नव्हतं. इशार्‍यानंच एक्साईटमेण्ट शेअर करत होतो. जंप मास्टर मात्र ऑल्टिमिटरवर नजर ठेवून होता.तीन हजार फूट उंचीवर विमान पोहचलं होतं. जंप मास्टर त्याच्याजवळच्या गो-प्रो या छोट्या पोर्टेबल कॅमेर्‍याने कधी व्हिडीओ तर कधी फोटो काढत माझी एक्साईटमेण्ट टिपत होता.
आणि मग तो क्षण आला.
३५00 फूट. जंप मास्टरने मला रेडी होण्यासाठी खुणावलं. मी माझ्या गुडघ्यांवर बसून सज्ज. आधी पाय बाहेर काढायचा. दोन्ही हाताने विमानाला गच्च धरून ठेवायचं मग दुसरा पाय बाहेर काढायचा आणि मग.. आपोआपच आपला अख्खा देह सोडून द्यायचा. विमान सुरूच.विमानाला बांधलेल्या एका जाड दोरखंडाला आपण लटकलेले.भरारा वार्‍यावर विमानाला चिकटलेले.पाय अजून छोट्या फूट पेडीस्टलवर.हळू हळू आपले हात सरकवत रेड मार्किंग केलेल्या दोन पट्टय़ांच्या मध्ये आणायचे. एवढं केलं की पाय हवेत लटकायला लागतात.
मी लटकत होते. खाली तर पहावतच नव्हतं.
तेवढय़ात मी जंप मास्टरकडे पाहिलं. त्यानं ‘गो’ असं खुणेनं सांगत, थम्स अप केला. त्याक्षणी मी हात सोडले पृथ्वीच्याच्या दिशेनं देह सोडून दिला.
गुरुत्वाकर्षणाच्या जीवावर अख्खीच्या अख्खी मी जमिनीच्या दिशेनं खाली जाऊ लागले. किती विचार केला होता की, उडी मारल्यावर अमुक होईल पण ज्या क्षणी मी रोप सोडला आणि विमानातून खाली उडी मारली तो क्षण काही इमॅजिनच करता आलेला नव्हता.

the photo session

आत्ता मात्र ते सारं लख्खं आठवतंय.
सरळ-सुसाट मी खाली झेपावत होते. काही सेकंदात पॅराशूट उघडलं आणि माझं पडणं जरा स्लो झालं.मी पॅराशूटच्या हॅण्डलमध्ये हात अडकवले, एकदम कण्ट्रोलमध्ये आल्या गोष्टी असं वाटलं. एक भन्नाट नजारा डोळ्यात भरून घ्यायलाच हवा होता.क्षितिज दिसत होतं, गोलाकार जमीन.थंडीतल्या धुक्यात न्हालेलं वातावरण. मी डोळे भरून सारं पाहत होते.
तेवढय़ात माझ्या कानात सूचना वाजू लागल्या.मी जमिनीपासून १५00 फुटांवर होते.कानातला आवाज सांगत होता.लेफ्ट टर्न, थोडंसं राईट.
आणि तो आवाज ऐकतच मी सेफ लॅण्डिंग केलं.मस्त जगले वाचले. विमानातून उडी मारूनही जिवंत परत आले. यायलाच हवं होतं ना, तुमच्या सगळ्यांसोबत हा भन्नाट अनुभव शेअर करण्यासाठी!

 

 

 

 

This written piece was first published in LOKMAT newspaper on 10th January 2014

It was also published in the Blog Space of IBN LOKMAT news channel’s official website www.ibnlokmat.tv on 12th January 2014

I had produced and anchored a show for IBN LOKMAT channel. Here is the link for the entire show called Darna Mana Hain

 

The following two tabs change content below.
Works in Documentaries and Film Industry, Canada Always on a 'SEE FOOD' DIET

4 Responses to “I jumped from an Aircraft @ 3500 ft ! – Skydiving India”